Skip to main content
x

पाटील, पांडुरंग गणपत

      प्राचार्य पांडुरंग गणपत पाटील यांचा जन्म कवलापूर जि. सांगली येथे झाला. त्यांचे मातृछत्र लहानपणीच नाहीसे झाले. वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांनाही १९४० मध्ये  देवाज्ञा झाली. त्यामुळे त्यांचा सांभाळ आजीनेच केला.

१९३४ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कवलापुरास राजरत्न माने-पाटील यांना भेट दिली असता प्राथमिक शाळेच्या हस्तलिखितात सुंदर हस्ताक्षरातील लेख पाहिला. हा लेख पांडुरंग पाटील या विद्यार्थ्याने लिहिलेला आहे असे समजताच त्यांनी सदर विद्यार्थ्यास आजीच्या संमतीने सातारा येथील वसतिगृहात आणले. (१९३४-४०) शिक्षणासाठी त्यांना नगरपालिका शाळा नं. ३ येथे घातले. याच शाळेतून त्यांनी १९३५ मध्ये व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा मध्य विभागातील दहा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. न्यू इंग्लिश स्कूल, सातारा मधून १९४० मध्ये मॅट्रिकची परीक्षा विशेष प्राविण्यासह ते उत्तीर्ण झाले.

इंटर आर्टसची परीक्षा (१९४२) ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. इंग्रजी विषयात त्यांनी हचलिंग्ज पारितोषिक  संपादन केले. फर्गसन महाविद्यालय, पुणे येथून १९४५ मध्ये बी.ए. ची परीक्षा इंग्रजी ऑनर्ससह उत्तीर्ण झाले. इंग्रजी विषयात प्रथम आल्याबद्दल मुंबई विद्यापीठाची एलिस शिष्यवृत्ती मिळाली. उच्च शिक्षणासाठी १९४६ - ५१ इंग्लंडमध्ये वास्तव्य केले. १९४९ किंग्ज कॉलेज, लंडन येथून इंग्लिश विषयातून त्यांनी बी.ए. पदवी घेतली. २३ जुलै, १९५२ बार अ‍ॅट लॉ ही पदवी प्राप्त झाली.

भारतात परत आल्यानंतर आर्थिक लाभाच्या उच्च पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध असतानाही महात्मा गांधी व कर्मवीर अण्णा यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे त्यांनी शिक्षक  म्हणून १२० रूपये पगारावर काम करण्यास प्रारंभ (१९५२) केला.

१९५४ मध्ये त्यांनी एम. ए. इंग्रजी ही परीक्षा दिली. ही परीक्षा ते पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. शिवाजी महाविद्यालय, सातारा मधून त्यांची बदली कराड येथे झाल्यानंतर एम.ए. (इंग्रजी) चे वर्ग कराड येथे सुरू करण्यास शिवाजी विद्यापीठाने खास बाब म्हणून परवानगी दिली. पी.जी. व त्यांच्या पत्नी  सुमतीबाई पाटील यांनी एम.ए. (इंग्रजी) च्या अध्यापनातून शिवाजी व पुणे विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांना इंग्रजी विषयाचे प्राध्यापक उपलब्ध करून दिले.

१९५७-६४ या कालावधीत ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड येथे ३ वर्षे व शाहू महाविद्यालय, कोल्हापूर येथे २ वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविले. प्रशासन हे विद्यार्थ्याभिमुख असावे हा दृष्टिकोन कार्यवाहीत आणला. कमवा व शिका या योजनेतील विद्यार्थी बहुश्रुत व्हावेत यासाठी खास प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रीतीने आपले जीवन घडवावे यासाठी आपल्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती केली.

बॅरिस्टर पी.जी. पाटील हे उत्तम शिक्षक होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, गाढा व्यासंग, प्रभावी अध्यापन शैली यामुळे त्यांचे अध्यापन विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असे. व्याख्यानात ते अनेक लेखकांचे आणि कवींचे संदर्भ देत असत. क्रमिक पुस्तकांच्या चाकोरीतच स्वत:ला बंदिस्त न ठेवता विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन अपूर्व असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांच्या या पद्धतीमुळे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यासंग वृद्धिंगत केला व आदर्श, शिक्षक व प्राध्यापक असा लौकिक संपादन केला आहे. पी.जी. सरांचे वक्तृत्व हे सर्वसामान्य श्रोत्याला समजणारे होते. अवघड विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जात असे. भाषणात अनेक अवतरणे, उदाहरणे यांचा समावेश आपोआपच होत असे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी केला. लोकशिक्षण व प्रबोधन व्हावे हाच उद्देश समोर ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी व्याख्याने दिली. 

१३ जानेवारी १९७५ रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक राज्यपालांनी केली. त्यावेळी सर्व सामान्य जनतेने त्यांचे प्रचंड स्वागत केले. आपल्या कुलगुरू पदाच्या कालावधीत त्यांनी विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे हितसंबंध जपणारी संस्था आहे याचा विसर पडू दिला नाही. प्रशासनात सहनशीलता, आत्मीयता व कार्यक्षमता या त्रिसूत्रीचा अवलंब केला. सर्वांना बरोबर घेऊन कारभार करण्याचा प्रयत्न केला.

पदवीदान समारंभासाठी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अतिथी बोलावून त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले. २१ नोव्हेंबर १९७९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून करण्यात आली.

आपल्या कार्यशैलीने त्यांनी येथेही स्वत:चे स्थान निर्माण केले. पदाचे पावित्र्य त्यांनी अखेरपर्यंत राखले. तसेच जनतेला व विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाची कार्यपद्धती माहीत व्हावी यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ठिकठिकाणी व्याख्याने दिली व प्रबोधन केले.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करीया उक्तीनुसार पी.जी. पाटील व सुमतीबाई पाटील यांनी जीवनभर संचित केलेले धन विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था, विद्यार्थिनी वसतिगृहे, कवलापूर येथील विद्यालय, त्यांच्या  सहवासात आलेले विद्यार्थी व त्यांच्या घरी काम करणाऱ्यांना आपल्या इच्छापत्राद्वारे दिलेले आहे. आपले कर्मवीर छाया हे निवासस्थान त्यांनी शिवाजी विद्यापीठास विद्यार्थी विकासासाठी त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने अर्पण केले आहे.

- प्रा. वसंत रोकडे

पाटील, पांडुरंग गणपत