रित्ती, श्रीनिवास हनुमंताचार्य
डॉ.श्रीनिवास हनुमंताचार्य रित्ती हे भारतातील अग्रगण्य पुराभिलेखतज्ज्ञ आहेत. कर्नाटकासहित महाराष्ट्रातील बहुसंख्य, विशेषत: नांदेड, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील कन्नड कोरीव लेखांचे वाचन, संपादन व प्रकाशनाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. काही व्यक्ती एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच जन्म घेत असाव्यात असे वाटते; कारण डॉ. रित्ती यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यातील सर्व काळ कोरीव लेखांच्या विश्वातच काढला आणि त्याच्या अभ्यासात व संशोधनात रमण्यातच आपल्या आयुष्याचे सार्थक आहे, असे त्यांना वाटते. वडील हनुमंताचार्य तथा आई भारती यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हावेरी, जि. हावेरी (कर्नाटक) येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण कर्नाटक महाविद्यालय, धारवाड येथे झाले. त्यांनी बी.ए.ला संस्कृत व कन्नड विषय घेऊन, तर एम.ए.साठी संस्कृत व प्राकृत हे विषय घेऊन, पदवी प्राप्त केली. कर्नाटक विश्वविद्यालयातून प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विभागात देवगिरीच्या यादव राजघराण्यावरील ‘दि सेऊणस’ या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. रित्ती यांनी तत्कालीन मुंबई इलाख्यातील कायदा विभागात १९५३-१९५५ दरम्यान भाषांतरकार म्हणून सेवा केली. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागातील पुराभिलेख विभागाच्या कार्यालयात सेवेस आरंभ केला. ही सेवा त्यांनी १९५५ ते १९६४ पर्यंत रुजू केली. त्या वेळी पुराभिलेखाचे कार्यालय हे उटकमंड येथे होते. तेथे डॉ. रित्ती यांना डॉ. दिनेशचंद्र सरकार, डॉ. पांडुरंगराव देसाई, डॉ. बी.सी. छबरा, श्री. एन. लक्ष्मीनारायणराव, डॉ. जी.एस. गयी आदी बिनीच्या पुराभिलेखतज्ज्ञांचे सान्निध्य लाभले. या दिग्गजांच्या सहवासामुळे पुराभिलेखविद्येमध्ये डॉ. रित्ती पूर्ण लीन झाले. पुढे इ.स. १९६४ नंतर ते कर्नाटक विश्वविद्यालयात आले. तेथील प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराभिलेख विभागात क्रमश: व्याख्याते, प्रपाठक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून ते इ.स.१९६४ ते १९८९ पर्यंत सेवा रुजू करून सेवानिवृत्त झाले. विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.
उटकमंड येथील कार्यालयात एपिग्रफिकल असिस्टंट म्हणून काम करताना भूतपूर्व निजामराज्यातील लिंगसुगूर मानवी तालुक्यातील (जि. रायचूर) खेडे न् खेडे कोरीव लेखांचा शोध घेण्यासाठी अक्षरश: पिंजून काढले. या मोहिमेमध्ये शेकडो नवे लेख सापडले. त्यांतून अज्ञात असा ऐतिहासिक माहितीचा साठाच पुढे आला. नवीन लेखांचे वाचन व संपादन करून डॉ. रित्ती यांनी ते अनेक शोधनियतकालिकांतून व ‘एपिग्रफिया इण्डिया’ या भारत सरकारच्या पुराभिलेख विभागामार्फत प्रसिद्ध होणार्या नामांकित नियतकालिकातून छापून प्रसिद्ध केले. कोरीव लेखांच्या वाचनाने अमूल्य व अज्ञात अशी ऐतिहासिक माहिती प्रकाशात येताना दिसून आल्यामुळे डॉ. रित्ती स्तिमित तर झालेच; परंतु या विषयाकडे ते पुरते ओढले गेले. प्राचीन कोरीव लेखांच्या वाचन व अभ्यासासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान तर आवश्यक आहेच, तथापि प्राचीन लिपी वाचण्याचे ज्ञान व समकालीन इतिहास ज्ञात असणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. रित्ती यांना संस्कृतबाबत अडचण नव्हती. लिपिवाचनाचे ज्ञान मात्र त्यांनी सरावाने प्राप्त करून घेतले. शिवाय, सोबतीला डॉ. पांडुरंगराव देसाई व एन. लक्ष्मीनारायणरावांसारखे गुरुजन होतेच. इतिहासज्ञानासाठी त्यांनी ग्रंथांना गुरू केले.
उटकमंड येथे असेपर्यंत या विद्येत त्यांनी बरीच प्रगती केली. त्याच सुमारास कोरीव लेखांसाठी वाहिलेल्या ‘साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स’च्या खंड १५, १८, २० यांसाठी मोलाचे योगदान दिले. अंत:स्फूर्तीने व विषयाच्या ओढीने नांदेड जिल्ह्यातील कोरीव लेखांचे ठसे डॉ. जी.सी. शेळके यांनी, सोलापूर जिल्ह्यातील कोरीव लेखांचे ठसे श्री. आनंद कुंभार यांनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ठसे श्री. ए.बी. करवीरकर यांनी संग्रहित करून त्या लेखांना बोलके करण्यासाठी डॉ. रित्ती यांच्याशी संपर्क साधला. सर्व योग योग्य रितीने जुळून आल्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील कन्नड कोरीव लेखांनी प्रकाश पाहिला. त्यांचे तीन खंड प्रसिद्ध झाले आहेत ः १) ‘इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट’ (१९६८), ‘इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट’ (१९८८) व ‘इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ (२०००).
भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली या संस्थेशी डॉ. रित्ती यांचा अनेक वर्षांचा संबंध आहे. सुमारे आठ वर्षे ते परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विजयनगर साम्राज्याशी निगडित कोरीव लेखांच्या संपादनाच्या योजनेचे संचालक म्हणून ते जबाबदारी पार पाडीत आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वत: व डॉ. बी.आर. गोपाल यांच्या सहयोगाने तीन खंड सिद्ध करून दिले. ते तिन्ही खंड परिषदेने प्रसिद्ध केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तेलुगू, तामीळ आणि संस्कृत कोरीव लेखांच्या संपादनाचे कार्य प्रगतिपथावर आहे. हे विजयनगर साम्राज्याच्या समग्र कोरीव लेखांचे एकत्रीकरण म्हणजे एक महत्त्वाचे कार्य होय.
पूर्वी डॉ. बी.एल. राइस या युरोपियन विद्वानाने संपादित व प्रसिद्ध केलेल्या ‘एपिग्रफिया कर्नाटिका’च्या पुन:परिष्करणाचे काम मैसुरू विश्वविद्यालयाच्या कन्नड अध्ययन संस्थेने सुरू केले असून त्याचे जिल्ह्यावार असे बरेच खंड प्रकाशित झालेले आहेत. या मालिकेत डॉ. रित्ती यांनी तुमकुरू जिल्ह्याचा खंड सिद्ध करून दिला आहे आणि तो प्रसिद्धही होत आहे. दावणगेरे जिल्ह्याचे काम प्रगतिपथावर आहे. ‘साउथ इण्डियन इन्स्क्रिप्शन्स’ या मालिकेतील एका खंडाचे कामही सुरू आहे.
कर्नाटक विश्वविद्यालयामध्ये सेवारत असताना त्यांचे प्रकाशित झालेले ग्रंथ असे : ‘हिस्टरी ऑफ कर्नाटक’ (१९७०), ‘अॅन्शण्ट हिस्टरी ऑफ इण्डिया’ या दोन्ही ग्रंथांचे सहलेखक डॉ. पी.बी. देसाई व डॉ. बी.आर. गोपाल, ‘दि सेऊणस’ (१९७२), ‘कर्नाटक ग्रमसूची’ (१९८५). या सूचीमध्ये जिल्ह्यावार ग्रमनामे कन्नड व इंग्रजी लिपीतून दिली आहेत. ‘डिस्क्रिप्टिव्ह ग्लॉसरी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म्स इन अॅन्शण्ट कर्नाटक’, (२०००) या ग्रंथात शब्दांचे अर्थ कन्नड व इंग्रजी भाषांत आणि लिप्यांत दिले आहेत. अनेक संशोधनात्मक लेख निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहेत.
कोरीव लेखांच्या अभ्यासाच्या प्रीतीतून डॉ. रित्ती व त्यांचे सहकारी एकत्र येऊन त्यांनी १९७५ मध्ये ‘अखिल भारतीय पुराभिलेख परिषदे’ची स्थापना केली. अशा एका केंद्रीय संस्थेची गरज होतीच. गेली ३६ वर्षे त्याची अधिवेशने विनाखंड भरत आहेत. नवीन पिढीतील अनेक पुराभिलेख विद्यासंस्थेपुढे येऊन आपले शोधनिबंध मांडतात. त्या निबंधांतूनच निवडक निबंधांची एक पत्रिका दर अधिवेशनासमयी प्रकाशित होत असते. या संस्थेत डॉ. रित्ती यांनी सचिव, अध्यक्ष आणि पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. रित्ती यांच्या पुराभिलेखविद्येच्या संशोधन व अविरत अमूल्य सेवेचे फळ म्हणून अनेक नामांकित संघसंस्थांनी त्यांचा गौरव व सन्मान करून काही प्रशस्ती पुरस्कार दिले आहेत. त्यांत शासकीय तथा शैक्षणिक सन्मानांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. रित्ती भारतीय पुराभिलेख परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवीत आहेत. आलूर वेंकटराय प्रतिष्ठानाचे ते मागील पंधरा वर्षांपासून अध्यक्ष असून त्या प्रतिष्ठानाकडून प्रसिद्ध होणार्या श्री. आलूर वेंकटराय समग्र साहित्याचे ते संपादक आहेत. इण्डियन हिस्टरी काँग्रेसच्या एका अधिवेशनाच्या पुराभिलेख विभागाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. कर्नाटक इतिहास अकादमी, भारतीय पुराभिलेख परिषद, भारतीय स्थलनाम परिषद, मराठवाडा इतिहास परिषद इत्यादी संस्थांच्या वार्षिक संमेलनांचे सर्वाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
भारतीय पुराभिलेख परिषदेच्या पुणे अधिवेशनाचे ते अध्यक्ष असताना (१९९२) त्यांचा परिषदेने ताम्रपट देऊन गौरव केला. बेंगळुरूच्या मिथिक सोसायटीने त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त डॉ. रित्ती यांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव केला. श्रवणबेळगोळचा ‘चारुकीर्ति भट्टारक प्रशस्ती’ (२००१), कर्नाटक इतिहास अकादमीचा डॉ. ‘बी.आर. गोपाल स्मारक प्रशस्ती’ (२००२), मंत्रालयाचे स्वामी राघवेंद्र स्वामी मठाचा ‘श्री सुजयश्री प्रशस्ती’ (२००७), कर्नाटक सरकारचा ‘सुवर्ण कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ती’ (२००७), कृष्णदेवरायांच्या पट्टाभिषेकाच्या पाचशेव्या वर्षानिमित्त कर्नाटक सरकारच्या पट्टाभिषेक समितीतर्फे सन्मान (२०१०), गुलबर्गा विश्वविद्यालयाकडून डी.लिटने गौरवान्वित (२०१०), चिदानंद प्रशस्ती समितीमार्फत (२०१०, बेंगळुरू) ‘शं.रा. जोशी प्रशस्ती’ कन्नड संघ, शिवमोग्गा (२०१०), ‘जीवन गौरव पुरस्कार’, रोटरी क्लब, धारवाड (२०११), कर्नाटक विद्यावर्धक संघ, धारवाड स्थापनादिनानिमित्त सन्मान (२०११), भारतीय प्राचीन विज्ञान व पुरातत्त्व संस्था, मैैसूरकडून सन्मान तथा गौरव सदस्यत्व (२०११), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नवी दिल्लीकडून अवॉर्ड ऑफ एक्सेलन्स (२०११), ‘श्री ना.श्री. राजपुरोहित प्रशस्ती’ (२०१२) इत्यादी सन्मान पुरस्कारांनी डॉ. रित्ती गौरवान्वित झाले आहेत.
डॉ. श्रीनिवास रित्ती यांनी इतिहास अधिवेशनानिमित्त जपानला तीन वेळा, तर जर्मनीतील बर्लिन येथे एकदा निबंधवाचनासाठी भेटी दिल्या आहेत.