Skip to main content
x

सहस्रबुद्धे, यशवंत दत्तात्रेय

          शवंत दत्तात्रेय सहस्रबुद्धे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले. १९३९मध्ये त्यांचे वडील परदेशी वास्तव्यास गेल्याने त्यांनी यशवंत यांना नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवले. पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. जनरल थोरात यांचा आदर्श डोळ्यांसमोर असल्यामुळे भूसेनेत जायचे त्यांनी लहानपणापासूनच ठरवले होते. १९४५मध्ये त्यांना बी.ए.ची पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन मिलिटरी स्टडीजचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लगेचच त्यांना १९४६मध्ये डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

या प्रशिक्षणानंतर १९४६च्या डिसेंबर महिन्यात त्यांना मीरत येथे आर्मी सर्व्हिस कोअरमध्ये पहिले पोस्टिंग मिळाले.

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळताना भारताची फाळणी झाली. पाकिस्तानातून निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतात येऊ लागले. सीमा भागामध्ये आणि पाकिस्तानात ठिकठिकाणी दंगे माजले होते. हे एक प्रकारचे युद्धच सुरू होते. केंद्र सरकारने सहस्रबुद्धे यांची तुकडी सीमा भागाकडे रवाना केली. त्यापैकी  'ए.एस.सी.'ची तुकडी जालंधरमध्ये, तिथून पठाणकोट आणि पुढे चालत जम्मू-काश्मीरमध्ये गेली. या तुकडीकडेे जनावरांच्या वाहतुकीचे काम होते. या तुकडीमधून सहस्त्रबुद्धे जम्मूहून अखनूर, नवशेराला गेले. नवशेरात पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या दोन मोठ्या चकमकींमध्ये सहस्रबुद्धे सहभागी होते.

१९४८च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत झालेल्या लढायांमध्ये सहस्रबुद्धे यांच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले.त्यानंतर १९४९मध्ये त्यांची लखनौमध्ये पुरवठा विभागात बदली झाली. त्या वेळी ते लेफ्टनंट या पदावर होते. तेथील नेहमीचे काम सुरू असतानाच मूलभूत प्रशिक्षणासाठी त्यांना बरेलीला पाठवण्यात आले. १९५१मध्ये त्यांना कॅप्टन या पदावर बढती मिळून त्यांची बंगलोर येथे बदली झाली. तेथे नव्याने भूसेनेत भरती होणार्‍या तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम सहस्रबुद्धे यांच्यावर सोपवण्यात आले. तेथून पुढे दिल्लीत ग्राउण्ड लीझ ऑफिसरम्हणून त्यांची बदली झाली. त्याच वेळी जपानी भाषा व संस्कृतीच्या आकर्षणापोटी  त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून जपानी भाषेचे विशेष प्रशिक्षण घेतले. दोन वर्षे पूर्ण वेळ चाललेल्या या प्रशिक्षणानंतर त्यांची १९५७मध्ये संरक्षण मंत्रालयाने जपानी भाषेचे अधिकृत भाषांतरकार म्हणून नियुक्ती केली.

१९६०मध्ये पुन्हा त्यांची जम्मूत बदली झाली. तीन वर्षांनंतर त्यांची बदली बरेलीत झाली. बरेलीतच तीन महिन्यांचा ए.एस.सी.चा वरिष्ठ पदाचा प्रशिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर तेथेच त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली.

१९६०च्या जुलै महिन्यात त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेमधील भारताच्या सैन्य तुकडीतून कोंगो येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. चौदा महिन्यांच्या मुक्कामानंतर १९६१मध्ये भारतात परत आल्यावर सिमला येथे त्यांची नियुक्ती झाली. चीनबरोबरचे युद्ध १९६२मध्ये सुरू झाले. या युद्धात यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी निरीक्षक म्हणून त्यांच्या तुकडीला सीमेवर पाठवण्यात आले होते.

१९६४मध्ये पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये त्यांंनी चार महिन्यांचा पेट्रोलियम विषयातील प्रशिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांची बदली मुंबई व तेथून पुढे तेजपूरला झाली. तेथूनच त्यांनी ब्रह्मदेशाला भेट दिली. ब्रह्मदेश भेटीनंतर १९६७मध्ये त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली. त्यावेळी नव्याने आलेल्या टँक ट्रान्सपोर्टवर त्यांचे ट्रेनिंग सुरू होते. पुढे १९७१च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात हेच युनिट वापरले गेले. येथील दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना कॉलेज ऑफ कॉम्बॅट मध्ये वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण देण्यात आले.

१९७१च्या पाकविरूद्धच्या युद्धात त्यांची रवानगी  पंजाबात झाली. १९७३मध्ये दिल्ली येथील सेना मुख्यालयात  आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. येथे त्यांनी समन्वय विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांना ब्रिगेडियर म्हणून १९७४मध्ये बढती मिळाली आणि सेनादलांच्या पुरवठा आणि वाहतूक विभागाचे सहसंचालक म्हणून त्यांची जम्मूत नियुक्ती झाली. खरे तर लेफ्टनंट कर्नल पदानंतर कर्नल पदावर पदोन्नती होते. परंतु यशवंत सहस्रबुद्धे यांना थेट ब्रिगेडियरपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर जानेवारी १९७५ मध्ये लखनौ येथे  आणि १९७७मध्ये पुन्हा दिल्ली येथे सेना मुख्यालयात त्यांची नियुक्ती झाली.

यशवंत सहस्त्रबुद्धे यांना १९७८मध्ये मेजर जनरल पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर १९७९ पासून आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे कर्नल कमांडंट म्हणून त्यांनी निवृत्तीपर्यंत काम पाहिले.

मार्च १९८१ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती मिळाली आणि त्यांची सेनादलांच्या पुरवठा आणि वाहतूक विभागाचे महासंचालक म्हणून नेमणूक झाली. पुढे तीन वर्षांसाठी त्यांची राष्ट्रपतींचे ए.डी.सी. म्हणून नेमणूक झाली. मार्च १९८४ मध्ये ते सेनादलातून निवृत्त झाले.

यशवंत सहस्त्रबुद्धे यांना १९८३मध्ये परमविशिष्ट सेवा पदकप्रदान करण्यात आले. याशिवाय त्यांना भोसला भूषण’(१९८७), ‘शस्त्रपूजक सावरकर पुरस्कार’(२००६), तसेच ‘फर्ग्युसन अभिमान पुरस्कार’ (२००८) मिळाले आहेत. १९८४मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले . डेक्कन जिमखाना स्पोर्ट्सचे अध्यक्ष, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष, भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, नागरिक चेतना मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशा स्वरूपात ते  कित्येक स्वयंसेवी संस्थांबरोबर कार्यरत होते.

- वर्षा जोशी-आठवले

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].