Skip to main content
x

वाकणकर, लक्ष्मण श्रीधर

           देवनागरीसह सर्व भारतीय भाषा संगणकावर वापरात आणण्यासाठी आवश्यक ते मूलभूत संशोधन करणारे अभ्यासक व उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण श्रीधर वाकणकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील, गुणा छावणी येथे झाला. धारच्या शाळेतून ते मॅट्रिक झाले. मुंबईहून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची परीक्षा यशस्वीपणे दिल्यानंतर वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठ येथून ते बी.एस्सी.टेक. झाले. घरातील पोषक वातावरणामुळे वेदांच्या अभ्यासात ते पारंगत झाले व वडिलांच्या सतत वेगवेगळ्या भागांत होणार्‍या बदल्यांमुळे अनेक भाषा व लिप्या त्यांना अवगत झाल्या. या काळात त्यांच्यावर राष्ट्रीय विचारांचा प्रभावही होता.

आशा प्रॉडक्ट्सची सौंदर्यप्रसाधने असोत वा क्रोमोप्रिंट्ससारखा स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय असो, वाकणकरांची संशोधकवृत्ती त्यांच्या औद्योगिक व्यवसायात कायम राहिली. देवनागरी लिपीचे संगणकावर आरोहण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतीय लिप्यांमधील विविधता आणि गुंतागुंतीची लेखनपद्धती यांमुळे संगणकावर ही अक्षरे आणणे, आणि तीही एका समान सूत्राद्वारे आणणे हे एक मोठे आव्हान होते. वाकणकरांनी आपल्या कल्पकतेनेे आणि अभ्यासाने ते शक्य करून दाखवले.

महाराष्ट्र राज्य शासकीय मुद्रणालयाचे उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) बापूराव नाईक, लिपिकार लक्ष्मण वाकणकर, आर. सुब्बू (टाटा प्रेसचे जनरल मॅनेजर) आणि र.कृ. जोशी यांनी अक्षर संशोधन मंडळचालविले होते. भारतीय भाषांच्या लिप्यांचे यंत्रारोहण यांत्रिक व संगणकीय दृष्टीने करणे या प्रकल्पासाठी ते प्रयोगशील होते. इ.स. १९६८ मध्ये वाकणकर यांनी  गणेशविद्या : द इंडियन ट्रॅडिशनल अ‍ॅप्रोच टू फोनेटिक रायटिंगहा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील फोनेटिक ग्रफिक्सचा भाग त्यांनी ६ ते १० नोव्हेंबर १९६७ दरम्यान पॅरिस येथे झालेल्या अटायपीच्या, ‘असोसिएशन टायपोग्राफिक इंटरनॅशनल चर्चासत्रामध्ये वाचला होता. या मांडणीमुळे वाकणकर लिपिकारबनले.

लक्ष्मण वाकणकर यांनी १९७८ सालच्या जानेवारी महिन्यात टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीयेथे डॉ. सुधीर मुदुर व डॉ. पीयूष घोष यांच्या मदतीने प्रयोग करून ध्वन्यात्मक अणू-रेणूंच्या साहाय्याने संगणकावर अंत:प्रेषण (इनपुट) करून जोडाक्षरांसह बहि:प्रेषण (आउटपुट) सिद्ध केले. यामुळे एक क्रांतिकारी प्रयोग सिद्ध झाला आणि जगातील सर्व भाषांच्या लिप्यांचे संगणकीकरण सुलभ झाले. वाकणकरांचे भारतालाच नव्हे, तर सर्व जगाला हे अत्यंत मोलाचे योगदान आहे. वाकणकर व डॉ. सुधीर मुदुर यांनी १९७८ मध्ये याचे पेटंट घेतले. या प्रयोगातील अक्षरांकन सुलेखनकार र.कृ. जोशी यांनी केले होते.

वाकणकरांचे संशोधन पाणिनीच्या व्याकरणापूर्वीच्या माहेश्वरी सूत्रावर आणि अ.ब. वालावलकरांच्या अशोकपूर्व ब्राह्मी लिपीच्या संशोधनावर आधारित होते. क, , , , प या वर्गीकरणानुसार सर्व अक्षरे विशिष्ट वक्राकारांवर आधारित आहेत. प्रत्येक अक्षराच्या आकाराचा संबंध उच्चारल्या जाणार्‍या ध्वनीशी संबंधित आहे, म्हणून ती ध्वन्यात्मकलिपी. वाकणकरांना ध्वनि-परमाणूंची कल्पना सुचली. अक्षरांमध्ये स्वर, व्यंजन आणि अ, , औ असे मात्राबळ देणारा, असे तीन घटक असतात. अशा मूलभूत घटकांची, ध्वनिपरमाणूंची संख्या बावन्नच्या आत भरते. संगणकासाठी त्या वेळी उपलब्ध असलेल्या प्रमाणित अ‍ॅस्की’ (एएससीआयआय) कोडमध्ये ही संख्या बसत होती आणि सर्व भारतीय लिप्या अशोकपूर्व ब्राह्मीवर आधारित असल्याने या लिप्यांचे मूलभूत घटक एकच होते. याचा आधार घेऊन संगणकीकरण करण्यात आले.

रेमिंग्टन, गोदरेज, हाल्डा यांच्या टंकलेखनयंत्रांसाठी (टाइपरायटर्ससाठी) देवनागरी व गुजराती अक्षर-वळणे ही वाकणकरांची निर्मिती आहे. १६ जानेवारी १९७९ रोजी लक्ष्मण वाकणकर यांच्याबरोबर प्रा. मुकुंद वासुदेव गोखले व एक्स्पर्टो इंडस्ट्रिअल एन्ग्रेव्हर्सचे कार्यकारी संचालक वसंत भास्कर भट यांनी मिळून इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्रफिकल रिसर्चया संस्थेची स्थापना पुणे येथे केली. येथे भारतीय लिप्यांचे अनेक प्रकारच्या अक्षरांचे आरेखन, कीबोर्ड लेआउटची रचना, डॉटमॅट्रिक्सची डिझाइन्स यांची निर्मिती होऊ लागली. या सेवा अनेक परदेशी व भारतीय कंपन्यांना पुरविल्यामुळे मुद्रणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. या ऐतिहासिक घटनेनंतर संपूर्ण भारतीय बनावटीचे स्वदेशहे संगणकीय सॉफ्टवेअर येथे सर्व भाषांसाठी उपलब्ध झाले.

वाकणकरांच्या प्रेरणेने कॅल्टिसचे (कॅलिग्रफी लेटरिंग अ‍ॅण्ड टायपोग्रफी ऑफ इंडिक स्क्रिप्ट्स)  आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पुणे, दिल्ली व कोलकाता येथे झाले. वाकणकरांनी कॅल्टिसच्या या विशेष अंकांचे, तसेच इ.स. १९८६ ते १९९७ या काळात अक्षररचनाया मुद्रण व  ग्रफिक आर्ट्स या विषयाला वाहिलेल्या मासिकाचे संपादन केले. कॅल्टिस८३, ८४, ८५, ‘अक्षररचनाआणि गणेशविद्या’ (इंग्रजी, मराठी) हे प्रकाशित ग्रंथ, आज महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ मानले जातात. याशिवाय त्यांचे संगणक, लिपिशास्त्र, इतिहास, भारतीय संस्कृती इ. विषयांवर पन्नासहून अधिक निबंध प्रकाशित झाले.

लिपिकार वाकणकरांचे व्यक्तिमत्त्व असे बहुआयामी असूनही ते प्रसिद्धिपराङ्गमुख होतेे. भीमबेटकाचे संशोधन करणारे प्रसिद्ध पुरातत्त्वसंशोधक वि.श्री. वाकणकर हे त्यांचे धाकटे बंधू होत. लिपिकार वाकणकरांचा मृत्यू उज्जयिनी येथे झाला.

- मुकुंद गोखले

संदर्भ :
वाकणकर, लक्ष्मण श्रीधर; ‘गणेशविद्या : ध्वन्यात्मक लेखनाची भारतीय परंपरा’; मानसन्मान प्रकाशन, पुणे; १९९८.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].