Skip to main content
x

व्ही. सुब्रमनियन

          सुब्रमनियन यांचा जन्म तामिळनाडू प्रांतातील शिवगंगा येथे जन्म झाला. त्यांचे शिक्षण व कार्य मात्र महाराष्ट्रातच झाले. त्यांच्या आईचे नाव अलमेलू.  सुमारे ९० वर्षांपूर्वी त्यांचे वडील विद्यानाथन मुंबईस आले व त्यांनी बी.ए. झाल्यावर इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये नोकरी केली. ते ‘सिनियर डेप्युटी अकाउंटंट जनरल’ या पदापर्यंत पोहोचले.

          सुब्रमनियन हे त्यांच्या पाच भावंडातील पहिले. त्यांचे शिक्षण एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले. इंग्रजी साहित्यात पहिल्या क्रमांकाने त्यांनी एम.ए. ही पदवी मिळविली. अशी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय. पुढे त्यांनी एलएल.बी. ही पदवी पहिल्या क्रमांकाने मिळविली. या दोन्ही परीक्षांत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. सुब्रमनियन यांनी आय.सी.एस.परीक्षा दिली. पण दृष्टिक्षमता कमी (उणे नऊ) असल्याने ब्रिटीश  सरकारने त्यांना अधिकारपद देणे नाकारले.

          ते नाराज झाले पण त्यांचे प्रयत्न चालूच होते. भारतीय सैनिक विभागात ते अधिकारी झाले. टाटांनी त्यांना टिस्कोमध्ये मानाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी पद देऊ केले.

          स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज काळात शारीरिक अक्षमता यावर नोकरी नाकारली गेलेल्यांना पत्र पाठवून बोलावून घेतले. सुब्रमनियन यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेतला.

           त्यांनी पोस्ट - असिस्टंट कलेक्टर विजापूर (१९४७ ते १९४९), संयुक्त निबंधक सहकारी संस्था (१९४९ ते १९५७), संयुक्त वस्त्रनिर्माण आयुक्त (१९५७ ते १९६१), खादी ग्रामोद्योग-प्रमुख कार्यकारी अधिकारी (१९६१ ते ६७-१९६८), विक्रीकर आयुक्त (१९६९ ते १९७०), व्यवस्थापकीय संचालक-महाराष्ट्र राज्य शेतकी महामंडळ (१९६९-१९७०), सचिव-महाराष्ट्र योजना विभाग (१९७० ते १९७४) व अतिरिक्त सचिव (१९७४ ते १९७७) अशी विविध पदे भूषविली.

            नंतर ते महसूल खात्यात दुष्काळ पीडितांचे कार्यालयामध्ये सचिव होते. येथील कामाच्या अनुभवावर त्यांनी ‘पर्चड अर्थ’ (तहानलेली पृथ्वी) असे पुस्तक लिहिले. त्यावर त्यांना डॉक्टरेटही पदवी मिळाली. त्यास देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरातील तज्ज्ञांची मान्यता मिळाली. देशविदेशात दुष्काळ या प्रश्नावर या पुस्तकाचा संदर्भ नेहमी घेतला जातो.

           ते माटुंगा मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार होते. राज्य योजना मंडळाचे १९८०-१९८१ मध्ये उपाध्यक्ष होते. या शिवाय १९८१ ते १९९३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री पद, गृहनिर्माण व नागरी विकास खात्याचे मंत्रीपद, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद भूषविले. १९९० ते २००३ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व बजाज प्रतिष्ठान यांचे ते संचालक होते. तसेच ते २७ वर्षे षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष होते तर १५ वर्षे विश्वस्त मंडळाचे सदस्य अध्यक्ष होते.

- रोहिणी गाडगीळ

व्ही. सुब्रमनियन