Skip to main content
x

वर्मा, माणिक अमर

गायिका हिराबाई दादरकर यांच्या पोटी पुणे येथे माणिकबाईंचा जन्म झाला. त्यांचे बालपण सुर-लयीतच गेले. भारत गायन समाजातील अप्पासाहेब भोपे व नंतर भास्करबुवा बखले यांचे शिष्य बापूराव केतकर, बागलकोटकर बुवा यांच्याकडे त्यांचे आरंभीचे शिक्षण झाले. तानरस घराण्याचे इनायत खाँ, गुलाम रसूल खाँ, तसेच  हैदराबादचे बशीर खाँ यांचेही मार्गदर्शन त्यांनी घेतले.
वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी सूरत येथे झालेल्या त्यांच्या मैफलीतील गाण्याने ओंकारनाथ ठाकुरांसारख्या दिग्गज गायकानेही त्यांची तारीफ केली. त्यानंतर सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी किराणा घराण्याचे शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित ‘गुणिदास’ यांच्याकडूनही त्यांनी तालीम घेतली. अलाहाबादच्या भोलानाथ भट्ट यांच्याकडून त्यांनी काही बंदिशी व विशेषत: ठुमरी-दादर्‍याच्या रचना घेतल्या.
या चौफेर शिक्षणामुळे सुरेलपणा, लय-तालाची प्रगल्भता आणि ख्याल, ठुमरी-दादरा, भावगीत, भजन या सर्व प्रकारांत त्या निपुण झाल्या. भास्करबुवांच्या गायकीतील पीळदारपणा, नेटका मोहकपणा, सुरेशबाबू व हिराबाईंचा सुरेलपणा व मार्दव, गुणिदासांचा बंदिशीच्या मांडणीतील डौल, इनायत खाँ व बशीरखाँची तनय्यत, सुरेशबाबू व भोलानाथांकडून मिळालेला ठुमरीचा बनारस व पंजाबी ढंग, बालगंधर्वांच्या गायकीतील लाघव व प्रासादिकता या सार्‍यांचे एकजिनसी रसायन माणिकबाईंच्या गाण्यात झाले.
त्यांच्या ढाल्या, बसक्या आवाजात विलक्षण गोडवा होता. त्यांच्या गळ्यातील जागा न् जागा दाणेदार, हरकती-मुरक्या स्वच्छ व नेमक्या असत. प्रचलित रागांच्या गायनाबरोबरच जोगकंस, चंद्रकंस, मधुवंती, अभोगी अशा तेव्हा अप्रसिद्ध असणार्‍या रागांना मैफलींत वारंवार गाऊन प्रचलित करण्यात त्यांचा वाटा होता. माणिक वर्मा दीपककेदार, देवगिरी बिलावल, नटमल्हार, गौरीसारखे अप्रचलित रागही अत्यंत समर्थतेने पेश करत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बसवराज राजगुरूंबरोबर त्यांनी जुगलबंदीच्या मैफली केल्या. आपली परंपरा जपून त्यांनी नवतेचाही स्वीकार केला. बुद्धीप्रधानता जपली, पण गाणे पांडित्यपूर्ण, जड केले नाही. सहजसोपी वाटावी अशी गायकी बनविली.
त्यांचा स्वभाव अत्यंत ऋजू, अजातशत्रू असा होता. व्यक्तित्वात असलेल्या निर्मळ निर्व्याजपणाचे प्रतिबिंब त्यांच्या गायकीवरही होते. सर्व गानप्रकारांवर त्यांची सारखीच व सहज हुकमत होती. माणिक वर्मा या खर्‍या अर्थाने बहुस्पर्शी गायिका होत्या.एच.एम.व्ही.ने जोगकंस, भटियार, श्यामकल्याण, देस, मारवा, बिहागडा या रागांतील त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या व त्यांद्वारे ख्यालगायिका म्हणून त्यांची कीर्ती देशभर पोहोचली.
बालगंधर्व हे माणिकबाईंच्या पिढीचे दैवतच होते. अर्थातच बालगंधर्वांची गायकी त्यांनीही अनुसरली व ‘नाथ हा माझा’, ‘अनृतची गोपाला’, ‘धनराशी जाता’, ‘खरा तो प्रेमा’, ‘तिमिरपटल भार विपुल’, ‘रूपबली तो नरशार्दुल’, ‘नृपकन्या तव जाया’, इ. अनेक नाट्यगीते त्यांनी मैफलींत गायली, तसेच त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या. ‘लाविते मी निरांजन’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’ अशी नवी नाट्यगीतेही त्या बाळ कोल्हटकरांच्या नाटकांसाठी गायल्या.
माणिकबाईंनी १९३९ साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली व या दोन ध्वनिमुद्रिकांद्वारे त्यांचे या क्षेत्रात पदार्पण झाले. यानंतर त्यांनी या क्षेत्रात आपली खास मुद्रा उमटवली. चित्रपटगीतांच्याही बाबतीत माणिक वर्मांचेे खास स्थान आहे. ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या ‘गोकुल’ या हिंदी चित्रपटातील ‘आया गोकुल में छोटासा राजा’ या सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताद्वारे त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, त्या अधिकतर मराठीच चित्रपटांसाठी गायल्या.
विविध संगीतकारांकडे माणिक वर्मा असंख्य भावगीते, भक्तिगीते, चित्रगीते गायल्या व ती मराठी जनमानसाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली. यांतील काही गाजलेली गाणी अशी : ‘सावळाच रंग तुझा’, ‘गळ्याची शपथ तुला’, ‘शरदाचे चांदणे’, ‘घननीळा लडिवाळा’, ‘बहरला पारिजात दारी’, ‘पहाट झाली उद्यानातुनी’, ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘गोकुळीचा राजा’, ‘सगुण निर्गुण’ (सुधीर फडके), ‘अंगणी गुलमोहर फुलला’ (दत्ता डावजेकर), ‘ऊठ राजसा घननीळा’ व ‘आभाळीचा चांद’ (गजानन वाटवे), ‘कौसल्येचा राम बाई’, ‘हसले मनी चांदणे’, ‘जा मुली शकुंतले सासरी’ (पु.ल. देशपांडे), ‘अमृताहुनी गोड’, ‘विजयपताका श्रीरामाची’ (बाळ माटे), ‘सांगू कशी ग मनाची व्यथा’, ‘त्या चित्तचोरट्याला’ (मधुकर गोळवलकर), ‘चांदण्या रात्रीतले’ (वसंत पवार), ‘त्या सावळ्या तनूचे’, ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘जनी नामयाची’, ‘भाग्य उजळले’ (दशरथ पुजारी), ‘घडीघडी चरण तुझे’, ‘आळविते मी तुला विठ्ठला’ (राम फाटक), ‘हरी भक्तीचा’, ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ (गोविंद पोवळे), ‘लाज राख नंदलाला’, ‘एकतारी गाते’ (श्रीनिवास खळे), ‘इथेच आणि या बांधावर’, ‘येऊ कशी घनश्याम’ (विठ्ठल शिंदे), ‘जाशी कुठे नवनीतचोरा’ (नीळकंठ अभ्यंकर), ‘शिवशंकर ते’ (प्रभाकर जोग), ‘उघड उघड पाकळी’ (वि.द. अंभईकर), ‘करात माझ्या वाजे कंकण’, ‘मनी माझिया नटले’ (वसंत आजगावकर), ‘सावळ्या हरीची’ (अशोक पत्की).
आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांतून माणिक वर्मा रसिकांसमोर आल्या. ‘गीतरामायणा’मधील त्यांनी गायलेली सीतेची पदे रसिकप्रिय ठरली. भारत व विदेशांतील अनेक मान्यवर रंगमंचांवरील मैफलींतून सादर झालेले त्यांचे गायन रसिकांनी वाखाणले. कवी अमर वर्मा यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांनी संसारही अत्यंत नेटका केला. चार मुलींचा संसार सांभाळून, घरात पाहुणे असले तरी गाण्यावाचून दिवसही काढला नाही, अशा तपश्चर्येचे हे गाणे होते. हिराबाई बडोदेकरांनंतरच्या पिढीत माणिकबाईंचे नाव एक आदर्श गायिका म्हणून घेतले जाई व त्यांचा हा आदर्श नंतरच्या अनेक कलावतींनी डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केली. माणिकबाईंनी मुक्त कंठाने विद्यादानही केले. आशा खाडिलकर, शुभा जोशी, अर्चना कान्हेरे, शैला दातारांसारख्या अनेक शिष्या त्यांनी तयार केल्या. भारती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा या त्यांच्या मुलीही कलाक्षेत्रात चमकल्या.
माणिकबाई १९७३ च्या सुमारास मेंदूज्वराच्या जीवघेण्या आजाराने अंथरुणास खिळल्या, मात्र या दुखण्यातून बाहेर पडून त्या पुन्हा जिद्दीने गाऊ लागल्या व तेवढ्याच जोमाने मैफली रंगवू लागल्या. अखेरच्या काळात त्यांना अँजायना हा विकार जडला व मुंबईत त्यांचे निधन झाले. माणिक वर्मांना ‘पद्मश्री’ (१९७४), ‘आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार (१९७७), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८६), ‘गदिमा’ पुरस्कार (१९९५) इ. अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या पश्चात मुंबईत ‘माणिक वर्मा प्रतिष्ठान’ स्थापून त्याद्वारे ‘माणिक रत्न’ पुरस्कार व शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच ‘स्वरानंद’ या संस्थेमार्फत ‘माणिक वर्मा बहुस्पर्शी’ पुरस्कार ख्याल, नाट्यगीत व भावगीत या तिन्ही गान प्रकारातील  उत्तम गायिकेस दिला जातो. भारत गायन समाजातर्फेही त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो व त्यांच्या पुण्यतिथीस विशेष मैफल सादर केली जाते.

 — चैतन्य कुंटे

वर्मा, माणिक अमर