Skip to main content
x

पळसुले, गजानन बाळकृष्ण

     ‘धुनिक संस्कृत महाकवी’ म्हणून यथार्थ गौरव झालेल्या गजानन बाळकृष्ण पळसुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा गावी झाला. बालपण गरिबीत गेले तरी बौद्धिक श्रीमंती आणि अपरंपार कष्ट यांच्या जोरावर पळसुले यांनी विद्वत्त्व व कवित्व संपादन केले. अगदी किरकोळ शरीरयष्टी असणारे हे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसिद्धिपराङ्मुख होते, परंतु आपल्या कर्तृत्वाने स्वत:ची आणि त्यांच्या संस्कृत रचनांची कीर्ती त्यांनी जगभर पसरवली. बालवयात वारावर भोजन करून शिक्षण पूर्ण करण्याची उमेद बाळगत त्यांनी संस्कृत-व्याकरणाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी १९४३ साली बी.ए., १९४८ मध्ये एम.ए. आणि १९५७ साली पीएच.डी. अशा पदव्या मिळविल्या. पीएच.डी.साठी त्यांनी संस्कृत धातुपाठ हा विषय निवडला होता. एम.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १९४९ साली ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात संशोधन साहाय्यक म्हणून काम करू लागले. ते १९५६ पर्यंत तेथेच कार्यरत होते. १९५६ साली ते डेक्कन महाविद्यालय, पुणे येथील संस्कृत कोश विभागात उपसंपादक म्हणून रुजू झाले. ते १९६४पर्यंत त्या पदावर राहिले. १९६५ ते १९७५ या कालावधीत पुणे विद्यापीठात संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात प्रपाठक म्हणून काम केले आणि १९७५ ते १९८२ या काळात तेथेच प्राध्यापक म्हणून सेवा केली. १९८२ ते १९८७ या काळात पुन्हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात स्नातकोत्तर विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आणि तेथेच विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या योजनेनुसार १९९०पर्यंत अतिथि-प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर एक वर्षभर त्याच संस्थेत प्राकृत कोश विभागात संपादक-साहाय्यक म्हणून काम केले. १९९३ ते १९९७ या कालावधीत साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ही सर्व पदे सांभाळात असतानाच त्यांनी पारंपरिक व्याकरणशास्त्र आणि आधुनिक संस्कृत साहित्य यांत अत्यंत महत्त्वाची भर घातली.

      पळसुले यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन कविकल्पदु्रम- बोपदेवीय धातुपाठाची चिकित्सक आवृत्ती, संस्कृत धातुपाठज्- अ क्रिटिकल स्टडी, अ कॉनकॉर्डन्स ऑफ संस्कृत धातुपाठज, सिक्स उपनिषद्स ऑफ द वेद या जर्मन ग्रंथांचा अनुवाद, व्हर्बल फॉर्म्स इन् दि ऋग्वेद (मण्डल-६), युभात: संस्कृत प्रति-इव्होल्युशन ऑफ संस्कृत फ्रॉम द प्रोटो-इंडो-युरोपिअन, संस्कृतचा इतिहास व पूर्वेतिहास, संस्कृत-भाषेच्या काही समस्यांवर आधुनिक भाषाशास्त्राने टाकलेला प्रकाश, वैदिक भाषेच्या जडण-घडणीचे काही पैलू हे ग्रंथ प्रसिद्ध केले. शेवटच्या तीन या वास्तविक मराठी व्याख्यानमाला होत्या व त्यांचे नंतर पुस्तकात रूपांतर झाले. याखेरीज व्याकरण शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे संशोधनपर लेख त्यांनी लिहिले.

     भर्तृहरीच्या महाभाष्य दीपिकेच्या काही खंडांचे चिकित्सक संपादन त्यांनी केले. हे खंड भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरानेच प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. या सर्व मौलिक अध्ययनपर ग्रंथांखेरीज त्यांचे ललित संस्कृत साहित्यही अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. त्यांपैकी अनुवादित साहित्याचा भाग पुढीलप्रमाणे- १) अग्निजा व २) कमला- हे दोन्ही सावरकरांच्या कवितांचे अनुवाद आहेत, तर ३) तुकावक्ति (तुका म्हणे) हा तुकारामांच्या अभंगाचा अनुवाद होय. आधुनिक संस्कृत नाटककार म्हणूनही त्यांची विशेष ख्याती आहे. भ्रातृकलह:, ४) यदा रायगडो जागर्ति, ५) अथातो ज्ञानदेवोभूत, ६) धन्येयं गायनी कला, ७) अत्रमृत्युर्विलज्जित:, ८) अन्धं युगम; ही नाटके भाषांतरित असली तरी आधुनिक विषयही संस्कृतातून किती समर्पकपणे मांडता येतात याचे उत्तम उदाहरण आहेत.

     वरील अनुवादित नाटकांखेरीज स्वप्रतिभेने लिहिलेली तीन नाटके म्हणजे आधुनिक संस्कृत साहित्याची भूषणे आहेत. १) ‘समानमस्तु वो मन:’ या त्यांच्या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाट्यरचनेचा भारत शासनाचा पुरस्कार १९६३, प्राप्त झाला आहे. २) सावरकरांच्या जीवनावरील ‘धन्योऽहं धन्योऽहं’ हे नाटक त्यांच्या देशभक्तीची व सावरकर भक्तीची साक्ष आहे. ३) ‘भासो हास’ या सर्वांगसुंदर नाटकात परंपरेने भासावर केलेले आरोप आणि अग्निदिव्याला सामोरी गेलेली त्याची नाटके हा विषय अतिशय नाट्यमयरीत्या मांडला आहे. विलक्षण कल्पकता, प्रतिभा, अभिजात संस्कृतातून दर्जेदार लेखन ही डॉ. पळसुले यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृत नाटक सादरीकरणाच्या स्पर्धांमध्ये वरील नाटकांच्या प्रयोगांनी सर्वोत्कृष्ट नाटककाराचे पारितोषिक अनेकदा मिळविले आहे. वरील साहित्यकृतींमध्ये भर पडली आहे ती ‘विनायकवीरगाथा’ आणि ‘विवेकानन्दचरितम’ या दोन चरित्रांची! कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावी अशी ही दोन व्यक्तिमत्त्वे, सावरकर आणि विवेकानंद! या दोघांनीही जणू डॉ. पळसुले यांच्या प्रतिभेला साद घातली आणि नव्या संस्कृत वाङ्मयात दोन चरित्रांची अनमोल भर पडली.

     या स्वतंत्र लेखनाबरोबरच भारतवाणी या संस्कृत पाक्षिक पत्रिकेचे आद्य संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या सर्व रचनांचा मुकुटमणी शोभलेली आणि डॉ. पळसुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी रचना म्हणून त्यांच्या ‘वैनायकम्’ या महाकाव्याचे नाव अमर झाले आहे. डॉ. पळसुले यांनी प्रथम सावरकरांवर ‘धन्योऽहं धन्योऽहं’ हे नाटक लिहिले मग त्यातूनच चरित्र लिहिले आणि त्यानेही समाधान न होऊन पूर्ण महाकाव्यच लिहिले. ब्रिटिश राज्याच्या अन्यायाचा हा जणू संस्कृतातला आलेख आणि त्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची तेजस्विता झळाळून उठते. या महाकाव्याला बिर्ला फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट संस्कृत-साहित्यकृतीचा पुरस्कार, कालिदास पुरस्कार व दालमिया पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळाले आहेत. यांखेरीज डॉ. पळसुले हे श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार, पुणे (१९९१), राष्ट्रीय संस्कृत-पण्डित राष्ट्रपति पुरस्कार, (१९९५), अमृतमन्दाकिनी गौरवग्रंथ समर्पणम् (१९९६), स्मृतिग्रंथमाला : षट्-प्रसूननि (२००६-२०११) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.

     व्याकरणकार आणि कवी या सामान्यत: निसर्गभिन्नास्पद मानल्या गेलेल्या दोन गुणधर्मांचा सुंदर आणि क्वचितच सापडणारा संगम डॉ. पळसुले यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. अत्यंत मृदुभाषी, विनम्र, सतत कार्यमग्न आणि विद्यार्थिप्रिय अशा डॉ. पळसुले यांच्या निधनामुळे संस्कृत साहित्य क्षेत्र एका प्रतिभावंताला मुकले.

डॉ. उमा वैद्य

पळसुले, गजानन बाळकृष्ण