Skip to main content
x

जोशी, दत्तात्रेय पंढरीनाथ

     त्तात्रेय पंढरीनाथ जोशी मूळचे मराठवाड्यातील परभणीचे. नूतन विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण करून ते हैदराबादला आले. अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीत राहून त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. नंतर त्यांनी विवेकवर्धिनी विद्यालयात अध्यापन केले. इतिहासाचे प्रेम, पूर्वसुरींबद्दल आदर, कामाची आवड, अभ्यासू वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. जोशी इथे आले आणि सार्वजनिक कामांत गुंतत गेले. उस्मानिया विद्यापीठातील पुरातत्त्व विभाग व मराठी साहित्य परिषदेतील हस्तलिखितांच्या पोथ्या जोशी यांच्या नजरेखालून गेलेल्या आहेत. राज्य मराठी संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘हैदराबादेतील मराठी हस्तलिखिते’ या पुस्तकातील मराठी साहित्य परिषदेतील हस्तलिखिते ही सूची जोशी यांनी तयार केली आहे. जोशी यांनी अभ्यास, वाचन आणि लेखन यामध्ये कधी उसंत घेतली नाही. 

     ‘लक्ष्मणा स्वयंवर अर्थात विवेक विळास’ हे महानुभाव कवी डिंभ यांचे आख्यानक काव्य जोशी  यांनी संपादित केले आहे. सोळाव्या शतकातील या कवीने ‘कृष्णमुनी विराटदेशे कवि डिंभ’ या नावाने २५ ग्रंथ लिहिले आहेत. बृहत्सेन राजाच्या लक्ष्मणा या सुंदर कन्येला कृष्णाचे आकर्षण वाटते आणि कृष्णाला ती आवडते, या भागवतातील उल्लेखावरून डिंभने ३००० ओव्यांचे हे काव्य रचले. सोळाव्या शतकातील वाङ्मयीन परंपरेचे उदाहरण म्हणून जोशी यांनी त्याची चिकित्सा केली आहे. पंथीय काव्यापेक्षा त्याचे वेगळेपण कसे आहे, ते दाखवले आहे. ‘ज्ञानेश्वरांचा किंवा नरेंद्राचा प्रभाव असला तरी डिंभाचे म्हणून काही निराळेपण आहेच. विशेषत: संगीत, चित्र, नाट्य, कला व योग, वनस्पती युद्धशास्त्राचे तपशील देताना व वर्णने करताना कवीने नवी शब्दनिर्मिती घडवली आहे. हा प्रयत्न सबंध काव्यभर आहे, किंबहुना ते ह्या काव्याचे वाङ्मयीनदृष्ट्या मुख्य प्रयोजन आहे.’ हे विधान नवनवीन शब्दांची अनेक उदाहरणे देऊन जोशी यांनी येथे सिद्ध केले आहे.

     बहुभाषाकोविद जोशी यांनी विविध भाषांतील प्राचीन साहित्याचा वेध घेतला आहे. महाभारताचे वाङ्मयीन आकलन, मोरोपंतांचे कर्णपर्व यावरील अभ्यासपूर्ण लेख याची साक्ष देतील. उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठी संस्कृतीचा आविष्कार दखनी भाषेतून दाखवणारे दोन लेख लिहिले. दखनी भाषांतील साहित्यावर संत रामदासांचा प्रभाव दाखवून शाह तुराब (१८वे शतक) यांच्या ‘मनसमझावन’चा परिचय करून दिला. हे काव्य, मनाचे श्लोकांवर आधारित आहे. त्यांनी चार्ल्स ब्राऊन या तेलगू अभ्यासकाच्या वाङ्मयीन जीवनाची ओळख करून दिली. १७९८ मध्ये जन्म झालेल्या या तेलगू शब्दकोशकाराचे आत्मचरित्र मराठी वाचकांसमोर उलगडले. विल्यम ब्राऊन याने १८१८मध्ये तेलगू भाषेचा शब्दकोश व व्याकरण (निघंटु) छापले होते; तर चार्ल्स तेलगू, तामिळ, मराठी, संस्कृतसह अनेक पाश्‍चात्त्य भाषा जाणत होते. त्यांनी दक्षिणेतील भाषांसाठी किती मोलाचे काम केले आहे, ते जोशी यांच्या शोधक नजरेमुळे आणि बहुभाषिकतेमुळे मराठीत आले आहे.

     जोशी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या आणि मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सुमारे ६० वर्षे निरंतर साहित्य सेवा केली. १९७४ पासून म.सा.प. आंध्र प्रदेशचे कार्यवाह आणि २००३पासून जीवनान्तापर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी काळात स्वतंत्र, अनुवादित, संपादित असे १५ ग्रंथ लिहिले. विख्यात तेलगू संशोधक के.व्ही. लक्ष्मणराव यांचे चरित्र लिहून त्याबरोबर त्यांचे तेलगू, मराठी आणि इंग्रजी लेखनही जोशी यांनी प्रकाशित केले. उस्मानिया विद्यापीठातील मराठी विभागाचे पहिले प्रमुख, प्राच्यविद्या, लोकसाहित्य यांचे अभ्यासक, मराठीतील साक्षेपी लेखन चिं.नी. जोशी यांचे चरित्र तर लिहिलेच, तसेच त्यांचे संशोधनपर साहित्य प्रकाशित करून प्राचीन साहित्याचा अभ्यास लोकांसमोर आणला. त्यांनी ‘निजाम विजय’ या वर्तमानपत्रातील १९२० ते ४० या कालखंडातील निवडक साहित्य प्रकाशित केले.

     या उपक्रमातून हैदराबाद संस्थानातील लोकजीवनाचा पट ‘काळाच्या पडद्याआड’च्या तीन खंडातून लोकांसमोर उलगडला. डॉ. ना.गो. नांदापूरकर यांचे समग्र साहित्य दोन खंडातून संपादित केले. या पुढचा भव्य प्रकल्प म्हणजे ‘सेतुमाधवराव पगडी समग्र साहित्य’. पगडी यांची ५० मराठी व १५ इंग्रजी पुस्तके ८ खंडातून संपादित केली. प्रा. जोशी व त्यांची पत्नी डॉ. उषाताई या प्रकल्पाचे प्रमुख संपादक व डॉ. विद्या देवधर व प्रा. धनंजय कुलकर्णी सहसंपादक आहेत. डॉ. गो.बं. देगलूरकर इंग्रजीच्या दोन्ही खंडांचे संपादक आहेत. पगडी यांचे प्राचीन साहित्य व इतिहास या विषयावरील हजारो पृष्ठांचे लेखन उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन जोशी यांनी वयाची ७५ वर्षे ओलांडल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण केला, यावरून त्यांची या विषयातील ओढ लक्षात येते.

     प्राच्यविद्या व इतिहास हे जोशी यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी स्वत: या विषयांचा अभ्यास केला आणि अन्य अभ्यासकांकडून करून घेतला. ‘पंचधारा’ हे म.सा.प.चे वाङ्मयीन त्रैमासिक. १९७४ पासून जोशी यांनी अनेक वर्षे त्याचे संपादन केले आणि शेवटपर्यंत पंचधारेसाठी ते नवनवीन विषय सुचवत होते. लिहीत होते. विद्वानांना लिहिते करून ते छापत होते. पुराणकथा आणि भारतीय ललित साहित्य या विषयावरील ‘पंचधारा’चा अंक, कूर्तकोटी यांचे लेखन, एकलव्य हे कन्नड नाटक, अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्राच्यविद्या म्हणजे केवळ शिलालेख नव्हे, हे लक्षात घेऊन प्राचीन साहित्याबरोबर संगीत, शिल्प, चित्र या सर्व कलांसंबंधी संशोधनाला, लेखनाला ‘पंचधारा’मध्ये स्थान दिले.

     संगीतकला आणि मध्ययुगीन साहित्य, प्राचीन व मध्ययुगीन संस्कृत व मराठी साहित्य आणि चित्रकला, स्थापत्य आणि वास्तुकला, शिल्प आणि मूर्तिशास्त्र, नृत्य-नाट्य, भारतातील मध्ययुगीन संतांचे सांगीतिक योगदान, तंजावरचे बृहदेश्‍वर मंदिर किंवा वेरूळचे कैलास लेणे यासारख्या विषयांवरील पंचधारेतील अभ्यासपूर्ण लेख जोशी यांच्या संपादन शैलीचे महत्व अधोरेखित करतात.

     मराठी साहित्य परिषदेतर्फे या विषयांची चर्चासत्रे जोशी यांनी आयोजित केली होती. अभ्यासू माणसाला संपूर्ण समाजात जागृती आणण्याची ओढ असेल, तरच तो केवळ स्वत:च्या संशोधनात न रमता व्याख्याने, चर्चासत्रे घडवून आणण्यासाठी धडपड करतो. द.पं. जोशी यांच्यासारखे बुद्धिमान आयोजक ही समाजाची आणि पर्यायाने भाषाभ्यासाची गरज आहे. दत्तात्रेय पंढरीनाथ जोशी यांनी १९५१पासून लेखनाला प्रारंभ केला. १९६० ते १९८४पर्यंत ते मराठवाडा वृत्तपत्रात साप्ताहिक स्तंभलेखन करीत होते. त्यांनी नरेंद्र कोहली यांच्या हिंदी कादंबरीचा ‘अहिल्योद्धार’ या नावाने अनुवाद केला.

    पौराणिक आशयाला धक्का न लावता त्या कथानकाचा आधुनिक संदर्भ कोहली यांनी लावला आहे, त्याचे वाङ्मयीन व सांस्कृतिक मोल लक्षात घेऊन जोशी यांनी हे काम केले होते. तोच दृष्टीकोन ठेवून त्यांनी जिलानी बानू यांच्या दोन कादंबऱ्यांचे अनुवाद केले. कुर्तुल एन हैदर यांच्या ‘पतझडकी लकीर’चा अनुवाद व श्री.व्यं. केतकर यांचे इंग्रजी चरित्र साहित्य अकादमीसाठी लिहिले. नरहर कुरुंदकर यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रमाची व अन्य अनुषंगिक विषयांची चर्चा करणारे लेख ‘हैदराबाद विमोचन आणि विसर्जन’ या नावाने संपादित केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या निवडक अभ्यासपूर्ण लेखांचे १२०० पृष्ठांचे चार संग्रह त्यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी प्रकाशित झाले. अनेक अभ्यासकांच्या व्यक्तिचित्रांचा एक संग्रह व ‘हैदराबादचा इतिहास व भारताचे राजकारण’, ‘मिर्झा गालिब व सरदार जाफरी यांची निवडक पत्रे’ असे दोन संग्रह आहेत. मराठी भाषिक जनसमूह आणि त्यांच्या  संपर्कातील दाक्षिणात्य संस्कृती, भाषा, इतिहास यांची चर्चा करणारे निवडक लेख ‘दक्षिण व प्रदक्षिणा’ या संग्रहात आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ डेक्कन स्टडीजचे ते पदाधिकारी होते.

    प्राच्य विद्यांमधून संस्कृतीच्या विकासाचा आलेख दिसून येतो, या विचारातून जोशी यांनी साहित्य सेवा केली. ‘मराठी व सबंध उर्वरित भारतीय साहित्य, कला व संस्कृती, व्यवहार याच्या ज्ञानसाधना आणि सर्जनशीलता या दोन अंगांनी होणारा, पण अनेक परीने होणारा आविष्कार न्याहाळणे हा  ‘पंचधारा’चा ध्यास आहे.’ पंचधारेतील अशा अनेक संपादकीयातून त्यांचे जीवनध्येय आणि ‘पंचधारा’चा ध्यास एकच असल्याचा प्रत्यय येईल.

    — डॉ. विद्या देवधर    

जोशी, दत्तात्रेय पंढरीनाथ