वाळिंबे, रामचंद्र शंकर
एक नामवंत साहित्यिक, सव्यसाची शिक्षक, तज्ज्ञ वक्ता, समीक्षक, नाट्यभाष्यकार, प्राचीन मराठी भाषा आणि संत साहित्य यांचे ज्येष्ठ जाणकार, संस्कृत विद्वान रामचंद्र शंकर वाळिंबे यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर संस्कृत (पूर्ण) घेऊन १९३३-१९३५मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.ए. झाले. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती व वरजीवन माधवदास शिष्यवृत्ती मिळाली. पुण्याच्या स.प.महाविद्यालयात ते संस्कृतचे फेलो झाले. १९३८मध्ये ते एम.ए. झाले व १९४३मध्ये त्यांनी शिक्षणशास्त्रातील बी.टी.पदवी मिळवली. ज्ञानेश्वरीतील ‘विदग्ध रसवृत्ति’ या विषयावर १९४३मध्ये त्यांना पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळाली. याच विषयावरील प्रबंधाला मध्य प्रदेश शासनाचा अ.भा. पुरस्कारही देण्यात आला.
वाळिंबे कुटुंबीय मूळ पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळ गावचे, ते नंतर पुण्यात स्थायिक झाले. डॉ. वाळिंबे हाडाचे शिक्षक होते. त्यामुळेच प्रारंभी १९३८-४२ याच काळात शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये ते संस्कृतचे अध्यापक झाले. याच मंडळाच्या टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये ते १९४३-४६ तीन वर्षे प्राध्यापक होते. नंतर सर परशुरामभाऊ (स.प.) महाविद्यालयामध्ये संस्कृत-मराठी विषयाचे प्राध्यापक झाले. १९४६-५६ सुमारे दहा वर्षे त्यांनी विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून नाव कमावले. शि. प्र. मंडळीच्या योजनेतून मुंबईच्या राम नारायण रुइया महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख म्हणून १९५६-६४ अशी आठ वर्षे आणि नंतर १९६४-६९ या काळात पुण्याला स.प. महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. नुकतीच पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. १९६९ साली मराठी विभाग प्रमुख म्हणून डॉ. वाळिंबे यांची नेमणूक झाली. त्यांच्या कार्याची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर पसरू लागली होती. याच वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे त्यांची वर्णी लागली आणि ‘साहित्य-समीक्षक’ स्वरूपात ते लोकांसमोर आले. प्रथम सभासद, नंतर पत्रिकेचे संपादक व १९६७-७३ या काळात ते कार्याध्यक्ष झाले. साहित्याच्या क्षेत्रात उज्ज्वल काम करीत असतानाच ते नाट्यक्षेत्रातही रस घेऊ लागले. परिणामी १९६६ ते ७३ या काळात ते पुण्याच्या सुप्रसिद्ध भरत नाट्य संशोधन मंडळाचे संचालक झाले. या काळात त्यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर संशोधनात्मक अनेक व्याख्याने दिली. १९७३ साली ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्याच काळात साहित्य अकादमीवर त्यांची नियुक्ती झाली.
नाट्यशास्त्राच्या अभ्यासानंतर मराठी जुनी नाटके आणि नाटककार यांच्याकडे त्यांची कुतूहलवृत्ती वळली आणि त्यातूनच नागपूर, कलकत्ता, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी विविध दृष्टीकोनातून मराठी नाटके आणि नाटककार यांचा अभ्यास करून त्यांनी व्याख्यानमाला गाजवल्या, त्यातूनच अभ्यासपूर्ण ग्रंथ जन्माला आले. त्यामध्ये ‘गडकर्यांचे अंतरंग’ (१९५१), ‘रंगभूमीवरील वास्तववाद’ (१९६६) ‘नाटककार गडकरी’ (१९५७), ‘एकच प्याला -विवेचक रसास्वाद’ (१९५९), ‘मराठी नाट्य समीक्षा’ (१९६८) अशी बहुमोल ग्रंथरत्ने वाचकांना पाहावयास मिळाली. त्याचबरोबर (१) ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना’, (२) ‘कुरुकुलाचा सीमावृक्ष’, (३) ‘भा.रा. तांबे यांची कलाविषयक भूमिका’, (४) ‘नॅचरॅलिझम’, (५) ‘प्राचीन भारतीय कला ः इतिहास आणि रूपदर्शन’, (६) ‘बालकवी ठोंबरे ः काव्यसमीक्षा’, (७) ‘मराठी वाङ्मय इतिहासाची प्रस्तावना’, (८) ‘मुक्तात्म्यापासून प्रमद्वरेपर्यंत’ (माडखोलकर कादंबरी समीक्षा), (९) ‘राधेय कर्ण’, (१०) ‘वाङ्मयीन टीका ः शास्त्र आणि पद्धती’, (११) ‘साहित्यमीमांसा’, (१२) ‘साहित्याचा धु्रवतारा’, (१३) ‘साहित्यातील अश्लील आणि ग्रम्य’, (१४) ‘ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ति’, (१५) ‘सुधाकर की एकच प्याला’, अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके त्यांनी अभ्यासकांच्या हाती दिली. साहित्यिक-समीक्षक व नाट्यशास्त्र भाष्यकार म्हणून डॉ. वाळिंबे लोकांसमोर आले.
एकीकडे नवनवीन विषयावर ग्रंथलेखन करीत असताना त्यांनी आवडीच्या ग्रंथांचे संपादन करून संस्कृत व मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांना अनमोल मदत केली. त्यांच्या संपादनात ‘अभिज्ञान शाकुंतल’, ‘मुद्राराक्षस’, ‘मेघदूत’, ‘वेणीसंहार’, ‘स्वप्नवासवदत्ता’, ‘मुद्राराक्षस’ (इंग्रजी), अशी संस्कृत संपदा, तर ‘केशवसुत — काव्य आणि परामर्श’, ‘संगीत भावबंधन’, मराठी निबंध’, ‘वाग्वैजयंती’, ‘संशय कल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘ज्ञानेश्वरी (अ. १६)’, ‘ज्ञानेश्वरी (अ. १७)’ अशी मराठीविषयक अनेक ग्रंथरत्ने त्यांनी अभ्यासकांना दिली. शिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी अभ्यासपूर्ण असे ३७ लेख प्रसिद्ध केले आहेत. नऊ ग्रंथांना प्रस्तावना, वीस ग्रंथांची अभ्यासपूर्ण परीक्षणे आणि डझनाहून अधिक मान्यवर विद्वानांचे ते पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. त्यामध्ये डॉ. हे.वि. इनामदार, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. केशवराव जोशी अशी कित्येक नावे घेता येतील.
डॉ. वाळिंबे १९६०नंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे वळले. समृद्ध संस्कृत साहित्य आणि डॉ. दांडेकर, डॉ. बेलवलकर, वैद्य यासारख्या दिग्गज संस्कृत पंडितांचा परिचय, यातूनच त्यांनी संस्कृत काव्य-नाटकाचा विश्लेषणात्मक अभ्यास केला. महाभारताची चिकित्सक आवृत्ती अभ्यासली. ते काही काळ संस्थेच्या रेग्युलेटींग समितीचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष होते. प्रत्येक शनिवारी सकाळी भांडारकर संस्थेच्या ग्रंथालयास भेट देऊन नवीन ग्रंथ आणि परिचितांच्या भेटी त्यांनी कधी चुकवल्या नाहीत.
डॉ. वाळिंबे आणि डॉ. वि.म. दांडेकर हे दोघे दिग्गज ज्योतिषशास्त्राचे पाठीराखे होते. त्यात दांडेकर ज्योतिषशास्त्र शिकलेले होते, तर वाळिंबे यांचा अभ्यास दांडगा होता. १९८० साली पुण्यात फलज्योतिष परिषदेचे पहिले अधिवेशन मोठ्या प्रमाणात झाले. सुमारे ५००-६०० ज्योतिषी भारतातून एकत्र आले होते. या परिषदेच्या उद्घाटनाला वाळिंबे सरांनी या शास्त्रावर आक्षेप घेणार्यांची भंबेरी उडवली, इतकेच नव्हे तर, पुढे आणखी एक-दोन परिषदांच्या उद्घाटनाला ते पुण्याबाहेर हजर होते. एखादा विषय मांडावयाचा म्हटले की ते त्याचा अंगोपांगांनी मुळापासून अभ्यास करीत. केशवराव जोशी यांचा थेसिस कुंडलिनी (योग) यावर होता. पू. गुळवणी महाराजांचे ते निकटवर्तीय होते. वाळिंबे सरांनी, मार्गदर्शन करावयाचे ठरवल्यावर त्याचा खूप अभ्यास केला. त्यावर एक-दोन व्याख्याने दिली. एक ग्रंथही लिहिला. महाभारत हा त्यांचा आवडता विषय. ‘सीमावृक्ष’ (भीष्म) आणि ‘राधेय कर्ण’ ही दोन पुस्तके लिहिताना त्यांनी भांडारकर संस्थेची चिकित्सक आवृत्ती पूर्णपणे अभ्यासली होती. शेवटी ते संगीताचा सामवेदाशी असणार्या संबंधाचा अभ्यास करीत होते.
डॉ. वाळिंबे यांच्या वक्तृत्वाचा पूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता. मध्य प्रदेश, गुजराथ, कर्नाटक, गोवा या जवळपासच्या राज्यांतून त्यांना व्याख्यानाची अनेक आमंत्रणे येत. गोव्याला जात असताना रेल्वे प्रवासातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.